घोटी : घोटी शहरातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यालगतच्या काही व्यावसायिकांनी नाल्याच्या बांधकासाठी तब्बल महिन्याभरापूर्वी खोदाई करून ठेवल्याने ही नाला खोदाई वाहतुकीला अडथळादायक ठरत आहे. दरम्यान नाल्याची खोदाई करून निघालेल्या मातीचा ढिगारा निम्म्या रस्त्यावरच टाकल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या नाल्याचे तत्काळ बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांकडून होत आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, घोटी शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी केंद्रीय मार्ग निधीतून विस्तारीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम झाल्यानंतर रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने रस्त्यालगतच्या गटारी व नाल्याची कामे जागोजागी अपुरी ठेवली. याचा त्रास दर पावसाळ्यात रस्त्यालगतच्या व्यापारीवर्गाला होत असतो. सांडपाण्याचा विसर्ग होत नसल्याने जागोजागी पाणी साचून दुर्गंधी येत असते आणि डासांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे स्टेशनरोड ते मूलचंद गोठी स्मारकापर्यंतच्या व्यापाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी दुकानासमोरील नाला स्वखर्चाने तयार करण्याचा निर्णय घेतला होता. नाला बांधकामासाठी रस्त्यालगत खोदकाम करण्यात आले होते. (वार्ताहर)
नाला खोदाई ठरतेय जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 22:08 IST