नाशिक : तरुणाईला वेड लावणारा ‘सैराट’ काही महिन्यांपूर्वी आला असला, तरी गेल्या काही वर्षांत एकूणच तरुणाईच्या घर सोडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फक्त मालेगाव व मनमाड शहरातून गेल्या अडीच वर्षांत तब्बल ३९१ युवक-युवती व अल्पवयीन मुले-मुली घराबाहेर पडल्याचे पुढे आले आहे. कुटुंबीयांकडून प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्याची कथा सांगणारा ‘सैराट’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रचंड गाजला. या चित्रपटाने समाजातील जातवास्तवावरही झगझगीत प्रकाश टाकला. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून युवक-युवतींच्या घर सोडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात प्रातिनिधिकरीत्या मालेगाव व मनमाड या दोन शहरांच्या पोलीस ठाण्यांतील आकडेवारी पाहिल्यास हे चित्र स्पष्ट होते. मालेगावमधून सन २०१४ मध्ये ४० तरुण, ६१ तरुणी, २०१५ मध्ये ४३ तरुण, ५६ तरुणी, सन २०१६ मध्ये (मेअखेर) १२ तरुण, २८ तरुणी हरवल्याची नोंद झाली आहे. तर मनमाड शहरातून सन २०१४ मध्ये १८ तरुण, १५ तरुणी, सन २०१५ मध्ये ७ तरुण, ९ तरुणी, तर सन २०१६ मध्ये (मेअखेर) १ तरुण, ८ तरुणी हरवल्या. दोन्ही शहरांतील मिळून एकूण १२१ तरुण व १८१ तरुणी बेपत्ता झाल्या. अर्थात, यातील ९६ तरुण व १४६ तरुणी कालांतराने घरी परत आल्या.
तरुणाई सैराट; पलायनात वाढ
By admin | Updated: July 24, 2016 23:21 IST