नाशिक : सातपूर दुहेरी हत्त्याकांडातील प्रमुख संशयित व प्रकाश लोंढे (पीएल) ग्रुपचा म्होरक्या भूषण प्रकाश लोंढे (रा.जगतापवाडी, सातपूर), त्याचे साथीदार संदीप रमेश गांगुर्डे (वय २५, रा. स्वारबाबानगर, आंबेडकर चौक, सातपूर) व आकाश दीपक मोहिते (वय २५, रा. त्रिमूर्ती चौक, अजिंक्य व्हिलेज रो-हाउस) या तिघांचीही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस़ भोर यांनी शुक्रवारी (दि़ १२) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ गत सात महिन्यांपासून फरार असलेल्या लोंढेसह त्याच्या दोन साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी पुणे येथून सापळा रचून अटक केली होती़ सातपूरच्या जगतापवाडीतील पीएल ग्रुपच्या कार्यालयात ३१ डिसेंबर २०१५ रोजी मध्यरात्री सराईत गुन्हेगार अर्जुन आव्हाड व निखिल गवळे या दोघांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता़ यानंतर मृतदेह फोर्ड एण्डिव्हर (एमएच १४, बीएफ १२१२) यावाहनात टाकून त्र्यंबकेश्वर-जव्हार रोडवरील तोरंगण घाटात फेकून देण्यात आले होते़ सुमारे सात दिवसांनंतर या दोघांचेही कुजलेले मृतदेह आढळल्यानंतर या दुहेरी हत्त्याकांडाला वाचा फुटली़या तिघाही संशयितांना मंगळवारी (दि़ ९) न्यायालयात हजर केले असता १२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ या तिघांचीही पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता या तिघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली़ दरम्यान, लोंढेच्या समर्थकांनी न्यायालयात मोठी गर्दी केली होती़ (प्रतिनिधी)
दुहेरी हत्त्याकांडातील संशयित लोंढेसह दोघांना न्यायालयीन कोठडी
By admin | Updated: August 14, 2016 02:22 IST