नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महिला सन्मान कार्यक्रमातील गोंधळ व महिला मारहाण प्रकरणी पोलिसांनी शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना मंगळवारी अटक केली होती. त्यांना बुधवारी (दि. ६) न्यायालयात हजर करण्यात आले. बडगुजर यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. भाजपा महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर या प्रमुख पाहुणे असलेला महिला सन्मान सोहळा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला होता. रहाटकर यांनी स्वतंत्र मराठवाड्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेने वचपा काढण्यासाठी धुडगूस घातला होता. या गोंधळप्रकरणी पोलिसांनी सेनेच्या संघटक सत्यभामा गाडेकर यांच्यासह सुमारे नऊ संशयितांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या सर्व संशयितांची जामिनावर सुटका झाली असून या गोंधळ प्रकरणात बडगुजर यांचाही सहभाग असल्याचा आरोप भाजपाने करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. पोलिसांनी बडगुजर यांना अटक के ल्यानंतर बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश डी.डी कोळपकर यांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अॅड. राहुल कासलीवाल, अॅड. हर्षद केंगे यांनी बडगुजर यांच्या वतीने युक्तिवाद केला. त्यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. ७) सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
बडगुजर यांना न्यायालयीन कोठडी
By admin | Updated: April 7, 2016 00:19 IST