नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) रविवारी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा घेण्यात आली. नाशिकमधील २५ केंद्रांवर शहरासह विभागातील विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणेसह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जेईई मेन परीक्षेतील एक पेपर अभियांत्रिकी पदवी व दुसरा पेपर बीटेक या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आला. परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असल्याने विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक पेपर दिल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली. नाशिकसह मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, अमरावती व नागपूर या शहरांतील विविध परीक्षा केंद्रांवर जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली. यात नाशिक शहरात वेगवेगळ्या २५ केंद्रावर सुमारे सोळा हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यापैकी सुमारे ५ टक्के विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचाही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परीक्षा प्रक्रिया शांततेत पार पडली. परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात शिक्षक व अधिकारी अशा दोन निरीक्षकांनी परीक्षेवर नियंत्रण ठेवत प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, शहराबाहेरून परीक्षा देण्यासाठी शहरात आलेल्या काही विद्यार्थ्यांना सकाळी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. परंतु परीक्षा कें द्रावर वेळेआधी पोहोचण्याच्या तयारीने शहरात दाखल झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रावर पोहचण्यासाठी कसरत करावी लागली. (प्रतिनिधी)
बंदोबस्तात ‘जेईई मेन’ परीक्षा
By admin | Updated: April 3, 2017 01:11 IST