नाशिक : ‘शौचालय असेल ज्याच्या घरी... मुलगी देऊ त्याच्याच घरी...’ या घोषवाक्यापासून लग्नपत्रिकेची सुरूवात एका ग्रामसेवकाने केली आहे. या लग्नपत्रिकेत स्वच्छ भारत व बेटी बचाओ अभियानाबरोबरच वृक्ष जगविण्याचाही जागर करण्यावर त्यांनी भर दिला आहे. सदर लग्नपत्रिका दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब गावात चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथे कार्यरत असलेले घनश्याम भदाणे यांचा येत्या १९ तारखेला विवाह होणार आहे. त्यांनी आपल्या लग्नपत्रिकेची सुरूवात ‘स्वच्छ भारत अभियान’ लोगोपासून केली आहे. याबरोबरच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासोबत वृक्ष जगवा असा जागर केला आहे. सदर पत्रिका संपुर्ण मडकीजांब गावात वाटप केल्या आहेत. या पत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचा जागर केला आहे. त्यांचे हे आगळे ‘निमंत्रण’ चर्चेचा विषय ठरला आहे. जनप्रबोधनासाठी एक पाऊल टाकत आगळी संकल्पना लढविल्याचे भदाणे यांनी सांगितले.
लग्नपत्रिकेतून ‘स्वच्छ भारत’ अन् ‘बेटी बचाओ’चा जागर
By admin | Updated: May 10, 2017 15:41 IST