नाशिक : गेल्या आठवड्याभरा-पासून सुरू असलेला आडते व व्यापाऱ्यांचा संप अखेर गुरुवारी मागे घेण्यात आला. सायंकाळी नाशिकसह जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये किरकोेळ शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहारही झाले. पावणेचार टक्के आडत खरेदीदारांकडून वसूल करण्यास व्यापाऱ्यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती नाशिक कृउबाचे व्यापारी संचालक जगदीश अपसुंदे यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती यांची तातडीची बैठक उद्या (दि. १५) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत याच बाजार समिती नियमन मुक्तीच्या निर्णयावर चर्चा होणार आहे.दुसरे शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी कांदा व बटाटा व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली असून, त्यांचे तत्काळ परवाने निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच या सर्व व्यापाऱ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, या कांदे व बटाटा व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कुंचबणा होत असल्याचा आरोप गोविंद पगार यांनी केला आहे. पगार यांच्या दाव्यामुळे व्यापारी संघटनेत मतभेत असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी बाजार समिती लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असला तरी कांदे व बटाटा व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याची चर्चा आहे.गुरुवारी दिवसभर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीतील व्यापारी व आडत्यांचा अपवाद वगळता जिल्ह्णातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आडते व व्यापाऱ्यांची बैठक सुरू होती. दुपारनंतर शेतमाल खरेदी- विक्रीच्या लिलावात व्यापारी व आडत्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे संचालक जगदीश अपसुंदे यांनी सांगितले. तसेच यापूर्वी घेण्यात येणारी खरेदीदारांकडूनची ७ टक्के आडत ही आता पावणे चार टक्के भरण्याचा व त्यातून शेतकऱ्यांची करपट्टी कोरी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अपसुंदे यांनी सांगितले. या निर्णयानंतर नाशिकसह जिल्ह्णातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी-विक्रीचे लिलाव पूर्व पदावर आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
तिढा सुटला, व्यापारी नरमले
By admin | Updated: July 15, 2016 02:10 IST