नाशिक : गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी वापरत असलेली हायफाय यंत्रणा व साधनसामग्री, गुन्ह्यांच्या पद्धतीतील बदल अन् त्यातच दुचाकी व चारचाकी वाहनांचा मोठ्या संख्येने केला जाणारा वापर यामुळे पोलीस विभागातील श्वानांना घरफोडी, चोरी, दरोडा, खून आदि गंभीर गुन्ह्यांमध्ये पूर्वीच्या तुलनेत गुन्हेगारांचा माग काढणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे़ चोरी, घरफोडी, दरोडा, खून या गुन्ह्यांमधील आरोपींच्या शोधाची वा त्यांचा माग काढण्यासाठी पोलीस श्वानांची मदत घेतात़ पूर्वी या श्वानांच्या जोरावरच मोठमोठे गुन्हे उघडकीस आले आहेत़ आजही बॉम्ब शोधण्याच्या कामाची मदार श्वानांवरच अवलंबून आहे़ पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकात लॅब्रोडोर जातीची ज्युली व सिंबा हे दोन श्वान आहेत़; मात्र ज्युलीचे वय दहा वर्ष झाल्याने प्रस्तावाद्वारे तिच्या सेवेचा कालावधी सहा महिन्यांनी वाढवून घेण्यात आला आहे़ श्वान विभागाला श्वानांची गरज असून त्यांनी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतरही एक श्वान मंजूर करण्यात आले आहे़ या दोन्ही श्वानांवर दरमहा पंधरा हजार रुपये खर्च केले जातात़ पूर्वी घरफोडी, चोरी, दरोडा, खून आदि गुन्ह्यांची उकल करण्यासाठी श्वानांची पोलिसांनी मोठी मदत होत असे़; मात्र आता गुन्हेगार हायटेक झाल्याने श्वान त्यांचा माग काढण्यात अपयशी ठरत आहेत.
श्वानांना माग काढणे अवघड
By admin | Updated: December 4, 2015 23:02 IST