नाशिक : जगाच्या नकाशावर नाशिकची ओळख जिच्यामुळे जपली आहे, त्या गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा महापालिका निवडणुकीत प्रभावी ठरणार असून, राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये या मुद्द्याला अग्रक्रम असणार आहे. गोदावरीच्या प्रदूषणाबाबत न्यायालयाने वारंवार फटकारले तरीही प्रशासनाकडून राबविल्या गेलेल्या उपाययोजना फोल ठरत आल्या आहेत. गोदावरी नदीतील प्रदूषणाचा मुद्दा नेहमीच धगधगता राहिलेला आहे. दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा गोदावरी नदीवर होत असल्याने नदीच्या पावित्र्याबाबत धार्मिक संस्था, संघटना नेहमीच सतर्क असतात. सन २०१५-१६ या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा पार पडल्याने या काळात गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पर्यावरणप्रेमींनी गोदा प्रदूषणाबाबत थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. गोदावरी पात्रात शहरातील सांडपाणी येऊन मिसळत असल्याने पाणवेलींची वाढ मोठ्या प्रमाणावर होते. दरवर्षी महापालिकेकडून पाणवेली काढण्यासाठी लाखो रुपयांचे ठेके काढले जातात. पाणवेली आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी यंत्रणेचा वापर होत नसल्याची टीका महासभेत वारंवार सदस्यांनी केली. परंतु, पावसाळ्याची वाट पाहणाऱ्या प्रशासनाकडून त्यावर प्रभावी उपाययोजना केली गेली नाही. गोदापात्राला सांडपाण्याचे येऊन मिळणारे एकूण १९ नाले बंदिस्त करण्याची कार्यवाही महापालिकेने सिंहस्थात केली परंतु, नंतर अद्यापही काही ठिकाणी सांडपाणी गोदापात्रात येऊन मिसळत असल्याची तक्रार पर्यावरणवादी अधूनमधून करत असतात. गांधीतलावापासून ते टाळकुटेश्वर पुलापर्यंतच्या गोदापात्रातील अस्वच्छतेचा तर नेहमीच उहापोह होत आला आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून अधूनमधून गोदा स्वच्छता मोहीम घेतली जाते, परंतु नंतर ‘जैसे थे’ परिस्थिती होते. रामकुंडावर देशभरातून विविध धार्मिक विधीसाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. परंतु, त्यांच्यासमोर गोदावरीचे ओंगळवाणे रूप पडत असल्याने नाशिकसंबंधी जगभर वेगळा संदेश जाऊन पोहोचतो. गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा, सिंहस्थ काळात बांधून ठेवलेल्या घाटांची निरुपयोगिता, पात्रात येऊन मिसळणारे सांडपाणी आदि मुद्दे महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांकडून चर्चिले जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाच्या जाहीरनामा-वचननाम्यातही गोदावरीचा मुद्दा प्राधान्याने राहणार आहे. (प्रतिनिधी)
गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ठरणार प्रभावी
By admin | Updated: January 31, 2017 00:35 IST