संजय देवरे
देवळा : देवळा नगरपंचायतीवर असलेले भाजपाचे वर्चस्व मोडून तेथे राज्यात यशस्वी ठरलेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युलाच नगरपंचायत निवडणुकीत वापरण्याचा मनसुबा विरोधकांनी व्यक्त केला असून, त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत.
निवडणूक ही राजकीय पक्षांना आपले बल अजमावण्याची एक संधी असते. त्यासाठीच तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपालिकांचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यात आले. यामुळे राजकीय पक्षांना आपले अधिकृत निवडणूक चिन्ह घेऊन उमेदवार उभे करता आले. परंतु गत निवडणुकीत देवळा नगरपंचायतीत वेगळे चित्र बघावयास मिळाले होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर व राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश आहेर यांनी एकत्र येऊन विकासाला प्राधान्य देत देवळा विकास आघाडीची निर्मिती केली, कॉंग्रेसचे जितेंद्र आहेर व शिवसंग्रामचे उदयकुमार आहेर यांनी जनशक्ती पॅनलची निर्मिती केली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पक्षाचे निवडणूक चिन्ह घेऊन सात प्रभागांत आपले उमेदवार उभे केले होते. पक्षाचे निवडणूक चिन्ह नसल्यामुळे उर्वरित सर्व उमेदवार तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत होते. भाजपाचे अधिकृत पॅनल नसल्यामुळे भाजपाचे स्थानिक आमदार डॉ. राहुल आहेर ह्या निवडणुकीपासून तटस्थ होते. निवडणूक निकालानंतर देवळा विकास आघाडीने १७ पैकी ८ जागा जिंकून आघाडी घेतली. सत्ता स्थापनेसाठी हे संख्याबळ मात्र पुरेसे नव्हते, परंतु चार अपक्ष नगरसेवकांनी देवळा विकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे बहुमत मिळून नगरपंचायतीची सत्ता देवळा विकास आघाडीकडे आली. जनशक्ती पॅनलने विजय मिळवलेल्या पाच जागांपैकी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिन्ह घेउन दोन उमेदवार विजयी झाले. यामुळे अधिकृत पक्षाचे दोन नगरसेवक व उर्वरित सर्व अपक्ष नगरसेवक अशी सरमिसळ झालेली बघावयास मिळाली होती.
नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथम नगराध्यक्षा म्हणून धनश्री केदा अहेर यांची निवड झाली. जिल्हा परिषद निवडणुकीत लोहोणेर गटातून धनश्री आहेर या जिल्हा परिषद सदस्य झाल्यामुळे त्यांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत केदा आहेर यांच्या भावजयी ज्योत्स्ना आहेर नगरसेवक झाल्या व नंतर त्या नगराध्यक्ष झाल्या.
नगरपंचायत स्थापनेपासून नगरपंचायतीवर केदा आहेर यांचे वर्चस्व राहिले आहे.
------ राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे भाजपा शिवसेना युती तुटलेली आहे. यामुळे देवळा तालुक्यात यापूर्वी एकत्रित दिसणारे भाजपा व शिवसेना हे चित्र आगामी नगरपंचायत निवडणुकीत बदलून शिवसेनेला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. यासाठी शिवसेनेचे शहर अध्यक्ष मनोज आहेर यांनी इतर मित्र पक्षातील नेत्यांशी भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.
----- सन २०१५ मध्ये झालेल्या नगरपंचायतीच्या प्रथम निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सात उमेदवारांचा अपवाद वगळता इतर कुठल्याही उमेदवाराने राजकीय पक्षाचे चिन्ह न घेता जनशक्ती पॅनल व देवळा विकास आघाडीतर्फे वेगवेगळे चिन्ह घेऊन अपक्ष निवडणूक लढविली होती. शहर विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवत सदरचा निर्णय घेतल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते. अपक्षांची निवडणूक म्हणून ती निवडणूक गाजली होती. आगामी निवडणुकीत मात्र सर्व राजकीय पक्ष पक्षाच्या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढवतील असे चिन्ह दिसत आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत रामेश्वर येथील किशोर सागर धरणातून देवळा शहरासाठी सुरू असलेले ९ कोटी ७२ लक्ष रुपये किमतीच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे कामाला उदयकुमार आहेर यांनी केलेल्या तक्रारीनंतर शासनाच्या आदेशामुळे स्थगिती देण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे. यामुळे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील अनियमिततेला यापुढेही नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे.
कोट...
केदा आहेर यांची स्वच्छ व सुंदर देवळा ही संकल्पना साकारण्यासाठी शहरात विकासाचे कार्यक्रम राबविले. त्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला, शहरातील रस्ते काँक्रीटीकरण, उद्यान विकास, भूमिगत गटारे, मुख्य शहरात भूमिगत विद्युतवाहिनी, बाजारतळ नूतनीकरण, व्यायामशाळा, कचरा संकलन, किशोर सागर धरण परिसर पर्यटन विकास आदी बहुतांश कामे पूर्ण केली आहेत.
- ज्योत्स्ना आहेर, नगराध्यक्षा, देवळा
कोट...
नव्यानेच नगरपंचायतीची स्थापना झाल्याने देवळा शहरवासीयांत आनंद, उत्साह व भरभरून अपेक्षा असणे साहजिकच होते. देवळा शहर विकास आघाडी या नावाचे रसदार गाजर दाखवत शहर विकास आघाडीने सत्ता काबीज केली खरी, पण मुळात सत्ता नेमकी कुणाला मिळाली? शहर विकास आघाडीला की एकहाती सत्तेला हा खरा प्रश्न आहे. शहराचा विकास व सौंदर्य या नावाखाली निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांना तिलांजली देत ठेकेदारी पोसली गेली. गेल्या पाच वर्षांत शहरात झालेला सामाजिक असमतोल, सामान्यांत दहशतीचे वातावरण हे विदारक वास्तव दुर्लक्षून चालणार नाही.
- सुनील आहेर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
इन्फो..
देवळा विकास आघाडीची शक्यता धूसर
गत नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत चिन्हावर दोन उमेदवारांना विजयी करण्यात मोलाची भूमिका निभावणारे जितेंद्र आहेर यांनी नुकताच कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यामुळे काही प्रभागांतील समीकरणे बदलली आहेत. नगरपंचायत निवडणुकीत देवळा विकास आघाडी पॅनलची निर्मिती करताना एकत्र आलेले भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत लोहोणेर गटात आपल्या अर्धांगिनींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यात धनश्री केदा आहेर यांनी बाजी मारली होती. आगामी नगरपंचायत निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर पुन्हा देवळा विकास आघाडी निर्माण होण्याची शक्यता मात्र धूसर झाली आहे.
310821\31nsk_21_31082021_13.jpg~310821\31nsk_22_31082021_13.jpg~310821\31nsk_23_31082021_13.jpg
ज्योत्स्ना आहेर~सुनील आहेर~देवळा नगर परिषद