कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी निफाड पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी निफाड तालुक्यात ३१५७ कोरोना रुग्ण असून दररोज ३०० ते ४०० रुग्णांची रोज नव्याने भर पडत आहे. त्याला आळा घालायचा असेल तर माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच ज्या गावांत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, पोलीस पाटील यांनी संयुक्त जबाबदारी घेऊन गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी औषध व ऑक्सिजन तुटवड्याबाबत चर्चा केली. पिंपळगाव बसवंत येथील भीमाशंकर इंग्लिश स्कूलमध्ये ६५ बेडचे सर्व सोयी सुविधायुक्त कोविड सेंटरची सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कंटेन्मेंट झोनमधील नियमांचे अतिशय कडक पालन करण्याबाबत तसेच निफाड गटातील पॉझिटिव्ह रेट ४० पेक्षा अधिक असून हा रेट १० पेक्षा कमी येण्याकरिता जास्तीत जास्त टेस्टचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. हॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये लसीकरणाचे नियोजन करून जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे निर्देशही दिले. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ग्रामस्तरीय समितीमध्ये पोलीस प्रशासनाच्या एका व्यक्तीच्या समावेश करण्यात यावा जेणेकरून गावात नियम पालनासाठी मदत होईल तसेच लसीकरणाच्या कॅम्पचे वेळापत्रक दिल्यास तिथेही पोलीस मनुष्यबळ गरजेनुसार पुरवण्यात येईल. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण करता येईल असे सांगितले. या बैठकीस बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, पंचायत समिती सभापती सुलभा पवार, पंढरीनाथ थोरे, उपअधिक्षक अर्जुन भोसले, सोमनाथ तांबे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, मुख्याधिकारी श्रीया देवचक्के आदी उपस्थित होते.