लोहोणेर : देवळा तालुक्यातील भऊर येथील जागरूक शेतकऱ्यांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अनधिकृत खते विक्रेत्यांविरुद्ध देवळा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना तत्काळ विक्रीबंदचा आदेश देऊन सटाणा व नाशिक येथील गुदामे बुधवारी सील करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी आर. बी. साळुंखे यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील अनधिकृत खतेविक्रे त्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी अनधिकृत खतेविक्रेत्यांची माहिती कळवून बक्षीस मिळवा,असे जाहीर आवाहन दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यास सभापतींचे वास्तव्य असलेल्या देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनीच सर्वप्रथम प्रतिसाद देऊन भऊर ता. देवळा येथे नवभारत फर्टिलायझर्स, हैदराबाद कंपनीच्या विक्री प्रतिनिधींनी अनधिकृतरीत्या कृषी विभागाची कोणतीही परवानगी न घेता शेतकऱ्यांना बांदावर जाऊन खते देण्याचा प्रयत्न केला केला. भऊर येथील विकास सोसायटीचे चेअरमन काशीनाथ नागू पवार, प्रगतिशील शेतकरी प्रभाकर नागू पवार यांना याची शंका आल्याने त्यांनी तत्काळ देवळा पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्कसाधून या घटनेची माहिती दिली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, ज्या खतांचा कायद्यात समावेश नाही, अशी खते संबंधित कंपनी शेतकऱ्यांना विकत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी संबंधित कंपनीच्या खते विक्र ी करणाऱ्या उमेश निकम (बुलढाणा), अल्मेश सोनवणे (सटाणा), गणेश सूर्यवंशी (सटाणा) या प्रतिनिधींना खते विक्रीबंदचा आदेश देत देवळा पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हैदराबाद येथील नवभारत फर्टिलायझर्स कंपनीच्या नावाने अमरीश नागेश्वर कर्डियाल यांनी नाशिक व सटाणा तालुक्यात दोन परवाने कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून घेतले होते. प्रत्यक्षात सदर परवान्यात सूक्ष्म अन्नद्रव्य विक्रीचा समावेश होता; मात्र नवभारत कंपनीच्या नावे इतर उत्पादने ज्यांचा कृषी विभागाशी संलग्न असलेल्या कायद्यात समावेश नाही, अशी ही खते आहेत असे भासवून शेतकऱ्यांच्या थेट शेतावर विक्री प्रतिनिधी पाठवून विक्री करण्याचा प्रयत्न कंपनीच्या वतीने चालू होता. (वार्ताहर)
तत्काळ विक्रीबंदचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 23:39 IST