दिंडोरी : तालुक्यातील जऊळके वणी येथे शनिमंदिराची उभारणी करून श्री शनिमहाराज मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. उद्या, बुधवारी शनिभक्त ह.भ.प.सुकदेव वाकीकर यांचे प्रवचन होऊन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.जऊळके वणी येथे शनिभक्त ह.भ.प. सुकदेव वाकीकर यांच्या प्रेरणेने व ग्रामस्थांच्या एकजुटीने शनिमंदिर साकारले असून, हे मंदिर तालुक्यातील तीर्थक्षेत्रामध्ये एक अतिशय सुंदर असे पुरातन कलेनुसार संपूर्ण दगडात बांधण्यात आले आहे. सोमवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते रथपूजन होऊन सवाद्य मिरवणुकीस सुरुवात झाली. या मिरवणुकीत घोडे, हत्ती, उंट तसेच ध्वजधारक विद्यार्थी तसेच नावाजलेले गुलालवाडीचे ढोल पथक, आदिवासी नृत्य, सुगम वाद्य, आतषबाजी, हत्तीवरून सुकदेव महाराजांनी भक्तांवर केलेली पुष्पवृष्टी, शनिमहाराजांचा आकर्षक रथ, सडा रांगोळी, भाविकांची प्रचंड गर्दी व उत्साह यामुळे मिरवणुकीला शाही मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या मिरवणुकीत प्रचंड गर्दी असूनही शांततेत पार पडली. त्यानंतर ब्रह्मवृंदांच्या व मंत्रोच्चाराच्या जयघोषाने प्राणप्रतिष्ठेस सुरुवात झाली. बुधवारी श्री सुकदेव महाराज वाकीकर यांचे प्रवचन होऊन महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सांगता होईल. (वार्ताहर)
जऊळके वणी येथे शनिमहाराजांची प्रतिष्ठापना
By admin | Updated: August 9, 2016 22:23 IST