नाशिक : साहित्य हे समाजमनावर दुरगामी परिणाम करणारे शस्त्र असून, साहित्यिक हा समाजातील चांगल्या- वाईट प्रवृत्तींवर साहित्यिक भाष्य करून एकप्रकारे चिरफाडच करीत असतो़ जगभरातील क्रांतीचा इतिहास पाहता या क्रांतीसाठी साहित्याने प्रेरणा दिली असून, यामध्ये मध्यमवर्गाची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले़ ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ‘मला भेटलेले साहित्यिक व त्यांचे साहित्य’ या विषयावर ते बोलत होते.शिंदे यांनी आपल्या राजकीय जीवनातील साहित्याची कथा उलगडताना सांगितले की, महाविद्यालयीन जीवनात कविता वाचनाच्या कार्यक्रमापासून साहित्याची ओढ निर्माण झाली़ आपल्या आयुष्यातील साहित्यिक प्रवास उलगडताना शिंदे यांनी महाविद्यालयात असताना आयोजित करण्यात आलेल्या कविता वाचनाच्या कार्यक्रमापासून साहित्याचा छंद लागल्याचे सांगितले. यानंतर कांदबरी वाचन, मुंबईची माणसं या नाटकांमध्ये काम त्यामुळे या क्षेत्राकडे अधिकच ओढला गेलो़ हरिनारायण आपटे यांच्या लेखनीतील ‘यमु’ आचार्य अत्रे यांची ‘निर्मला’ या त्या काळातील क्रांतिकारी महिलाच होत्या़ राम गणेश गडकरी यांचे ‘एकच प्याला’ हे त्या काळातील नाटक आजही तितकेच उपयुक्त असल्याचे आपल्याला दिसून येते़ साहित्यिक वसंत कानेटकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, वि़ वा़ शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, वामनदादा कर्डक, बाबूराव बागुल या साहित्यिकांचा सहवास लाभलेले नाशिककर खरोखर भाग्यवान आहेत़ मी काँग्रेसवाला असलो तरी पूर्वी कम्युनिस्टच होतो़ दुसऱ्याचे ज्ञान आपण का घेऊ नये म्हणून मी संघाचे साहित्य आणि कम्युनिस्ट असे दोन्हीही वाचतो़ बाळा सावंत हे आवडते लेखक, त्यांचे ‘मरणात खरोखर जग जगते’ हे पुस्तक तर माणसाला आपल्या जगण्याचे अर्थ शिकवून जाते़ संत तुकाराम, आचार्य विनोबा भावे, ना़ सी़ फडके, वि़ स़ खांडेकर, आचार्य अत्रे यांच्या विचारांतून आपल्याला प्रेरणा मिळाली़ वृद्ध असो की तरूण साहित्य सर्वांनाच वेगळ्या प्रांतात घेऊन जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले़यावेळी व्यासपीठावर माजीमंत्री विजय नवल पाटील, शोभाताई बच्छाव, उपमहापौर गुरुमित बग्गा, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, श्रीकांत बेणी, न्यासचे अध्यक्ष आनंद जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती स्टोअर्सचे वसंत खैरनार यांनी केले़ सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले़ यावेळी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांसह मान्यवर व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)सावरकर तुम्हाला समजलेच नाहीतस्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म नाशिकचा, ते थोर समाजसुधारक होते. त्यांचे साहित्य म्हणजे समाजसुधारणेबरोबरच समाजाला फटके मारण्याचेही काम करीत होते़ मात्र, त्यांचे विचार हिंदुत्ववाद्यांना पटले नाहीत, असे सांगत शिंदे यांनी अप्रत्यक्ष टीका केली. सावरकरांसारखा थोर समाजसुधारक तुमच्याकडे होता, मात्र त्याचे महत्त्व तुम्हाला समजले नसल्याचे ते म्हणाले़हिंदू धर्म मला आवडतो मात्र जाती-धर्मात अडकून पडणे मला आवडत नाही़ असे असले तरी सर्व धर्माचा मी आदर करतो़ मी जन्माने दलित असलो तरी युनिर्व्हसिटीत प्रथम आलो म्हणून मी ब्राह्मण, वकिली केली त्यामुळे वैश्य, पोलिसात असताना फायरिंगही केले त्यामुळे मी क्षत्रिय असे शिंदे म्हणाले.
साहित्यानेच मिळाली क्रांतीला प्रेरणा
By admin | Updated: September 26, 2016 01:16 IST