नाशिक : रविवारी (दि.१३) होणाऱ्या द्वितीय शाही पर्वणीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गोदाघाट परिसर तसेच साधुग्रामची पाहणी करत जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला.रविवारी महापर्वणीला गोदाघाटावर लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फेरनियोजन केले आहे. या नियोजनाचा आढावा घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी परिसराचा दौरा केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पालकमंत्र्यांसमवेत आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदि उपस्थित होते. याचबरोबर खास द्वितीय पर्वणीच्या नियोजनासाठी नेमणूक करण्यात आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी रवींद्रकुमार सिंघल, मकरंद रानडे यांच्याशीही पालकमंत्र्यांनी चर्चा करत बंदोबस्ताची माहिती घेतली. भाविकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्था राखण्याबाबत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना व पोलिसांना सूचना दिल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
गोदाघाटाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
By admin | Updated: September 12, 2015 23:41 IST