अस्ताणे : मालेगाव तालुक्यात पंचायत समिती सभापती भरत पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुष्काळी दौरा काढून पाहणी केली. त्यांनी अस्ताणे, लखाणे, कौळाणे आदि गावांना भेटी देत दुष्काळाची पाहणी केली. संबंधित यंत्रणेला व ग्रामपंचायतीला पाण्याच्या व्यवस्थेतही येत्या दोन ते तीन दिवसात उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.अस्ताणे येथे काल सभापती भरत पवार येणार असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ व कार्यकर्ते सकाळपासून त्यांची वाट पाहत बसले. मात्र प्रत्यक्षात ते संध्याकाळी उशिरा आल्याने ग्रामस्थांना ताटकळत उभे राहावे लागले. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पं. स. सभापती पवार पाण्याची परिस्थिती जाणून घेत असल्याने लोकांनाही त्यांच्या भेटीविषयी औत्सुक्य होते. अस्ताणे येथे सभापती आल्यानंतर त्यांनी गावातील पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या उपाययोजनां विषयी ग्रामस्थांकडे विचारणा केली. तसेच गावातील आदिवासी वस्तीत पाणी येते का याबाबत त्यांनी चौकशी केली असता सदर वस्तीत नळच नसल्याने त्यांना पाणी मिळत नसल्याचे पवार यांच्या लक्षात आले. पवार यांनी आदिवासी वस्तीत सार्वजनिक नळजोडणी देण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्या. अस्ताणे येथे पंचायत समितीकडून सौरदिवे मिळाले आहेत ते चौकाचौकात लावावे. हे सौरदिवे अशाच ठिकाणी लावावेत जेणेकरून पावसाळ्यात वीज गेल्यावर त्यांचा प्रकाश मिळू शकेल. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या घरासमोर लावू नये. तसेच पाण्याचा प्रश्न दोन-तीन दिवसात सोडवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सरपंच नबाबाई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देवरे, मालतीबाई उशिरे, प्रदीप देवरे, छोटू देवरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची पाहणी
By admin | Updated: March 20, 2016 22:29 IST