नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात मार्चमध्ये करण्यात आलेल्या निफाड तालुक्यातील एका २४ आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याचा आरोप जिल्हा रुग्णालयातील महिला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांच्यावर करण्यात आला आहे़ या प्रकरणी आरोग्य उपसंचालक घोडके यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या पाच सदस्यांच्या चौकशी समितीने रविवारी (दि़२) जिल्हा रुग्णालयात गर्भपात करण्यात आलेल्या महिलेच्या उपचारांच्या वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी केली़जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील उंबरखेड येथील गर्भवती महिला उपचारासाठी म्हसरूळ परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली होती़ या महिलेच्या प्रसूतीत अतिरक्तस्त्रावाची बाब घातक असल्याचे लक्षात घेत जिल्हा रुग्णालयात २१ मार्चला दाखल करण्यात आले़ महिलेच्या पोटातील अर्भकाच्या जिवास वा महिलेस कोणताही धोका नसताना तसेच अर्भकाच्या व्यंगावर उपचार करणे शक्य असताना २२ मार्च रोजी दुपारी या महिलेचा गर्भपात करण्यात आला़ त्यासाठी गर्भवती महिलेची परवानगी न घेता गर्भपात, अर्भकाचे शवविच्छेदन न करता महिलेच्या पतीला रात्री बोलावून परस्पर अर्भकाची विल्हेवाट लावल्याचा आक्षेप महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील गर्भपातविरोधी तसेच स्त्रीभ्रूण हत्त्या विरोधी पथकाने चौकशी अहवालात पथकाने नोंदविला आहे़जिल्हा रुग्णालयात गर्भपात करण्यात आलेल्या महिलेस दोन तासांतच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांनी फोनवरून दिलेल्या सूचनांच्या आधारे घरी पाठविण्यात आले़ या प्रकरणी महापालिकेच्या चौकशी पथकातील डॉ़ आरती चिरमाडे, डॉ़ प्रशांत मेतकर, डॉ़ प्रशांत शेटे, डॉ़ नितीन रावते, जितेंद्र धनेश्वर, विजय देवकर, स्नेहल भट, डॉ़मनोज चौधरी यांनी सखोल चौकशी केल्यानंतर २४ आठवड्यांचा गर्भपात बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष काढला आहे़ या पथकाकडे जिल्हा रुग्णालयात अवैध गर्भपात होत असल्याची निनावी तक्रार आल्यानंतर त्यांनी एक पथक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते़ (प्रतिनिधी)
जिल्हा रुग्णालयातील संशयास्पद गर्भपाताची चौकशी
By admin | Updated: April 3, 2017 01:01 IST