---------------------
सिन्नर येथे गोसावी यांचा सत्कार
सिन्नर : येथील पोलीस ठाण्यातील कर्मचारी हरिश्चंद्र गोसावी यांची सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल दशनाम गोसावी समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मानव सुरक्षासेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र गिरी, नगरचे जिल्हाध्यक्ष विजय गिरी, भैरवनाथ गोसावी, सूरज गोसावी, सचिन भगत, योगेश गोसावी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
----------------
पांगारकर यांचे उपोषण मागे
सिन्नर : तालुक्यातील पांगरी बुद्रूक येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण पांगारकर यांनी विविध समस्यांच्या निवारणार्थ सुरू केलेले संत हरिबाबा मंदिरातील बेमुदत उपोषण तूर्त स्थगित केले आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर पांगारकर यांनी उपोषण मागे घेतले. ग्रामविकास अधिकारी पंढरीनाथ बोरसे, वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रकाश उंबरकर यांनी मध्यस्थी करीत पांगारकर यांची समजूत काढल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
------------------
सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण
सिन्नर : शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण व प्रचंड उकाडा जाणवत होता. शुक्रवारी सायंकाळी सिन्नर शहर, भोजापूर खोऱ्यासह तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपासून कधी कडाक्याचे ऊन तर कधी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा होता. शनिवारीही दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन होते. त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.
--------------------
ग्रंथालय सेवा सुरू करण्याची मागणी
सिन्नर : एप्रिल महिन्यापासून ग्रंथालय सेवा बंद असल्याने वाचकांची गैरसोय होत आहे. अनेकजण घरी बसून टीव्ही व मोबाइलचा वापरामुळे आजारास बळी पडत आहे. त्यापेक्षा पुस्तक वाचन सुरू राहिल्यास वाचकांच्या ज्ञानात भर पडेल. अनेकांना घरी बसून पुस्तक वाचनाचा आनंद घेता येईल. त्यासाठी शासनाने ग्रंथालय सेवा सुरू करावी, अशी मागणी सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले आहे.