नाशिक : तूरडाळीच्या दरावरून सुरू असलेले राजकारण पाहता, सरकारने खुल्या बाजारातील व्यापारी व रेशनच्या माध्यमातून स्वस्त दरात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असला तरी, खुल्या बाजारात ९५ रुपयांनी मिळणारी तूरडाळ मात्र गोरगरिबांना रेशनमधून १०३ रुपये किलो दराने खरेदी करावी लागणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार चांदवड व मालेगाव येथे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना १२० रुपये किलो याप्रमाणे तूरडाळ देण्यात येत असून, आता शासनानेच खुल्या बाजारात व रेशन दुकानातून तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत, त्यासाठी डाळ ठेकेदारही निश्चित करण्यात आला आहे. रेशनवर मिळणाऱ्या तूरडाळीचा दर व खुल्या बाजारातून मिळणाऱ्या डाळीच्या दरात फरक आहे. राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना ९४ रुपये ३० पैसे दराने तूरडाळ मिळणार असून, त्यावर ७० पैसे कमिशन अशा पद्धतीने ९५ रुपये दराने व्यापारी तूरडाळ विक्री करतील, त्याचवेळी रेशनवर तूरडाळ १०३ रुपये दराने शिधापत्रिकाधारकांना खरेदी करावी लागणार आहे. म्हणजेच आठ रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकी किलोचे पॅकेट तयार केले जाणार आहे.(प्रतिनिधी)
खुल्या बाजारात स्वस्त, रेशनवर मात्र महाग
By admin | Updated: August 9, 2016 01:22 IST