मालेगाव : तालुक्यातील वडेल येथील इंदिरानगर भागातील रोहित्र जळाल्याने संपूर्ण भाग आठ दिवसांपासून अंधारात असून सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. गावालगत असलेल्या डाबली रोड परिसरातील लोकवस्तीला वीजपुरवठा करणारे रोहित्र मागील सोमवारी जळाल्याने त्याखालील गवत व फ्जुज असणाऱ्या पेट्या, केबल्स हे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.स्थानिक शाखा अभियंता कलाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठांना कळविले असून रोहित्र उपलब्ध झालेला असला तरी केबल्स व फ्युज असणाऱ्या पेट्या उपलब्ध होत नसल्याने वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यास उशीर होत असल्याचे सांगितले.तथापी गावालगतच्या या वस्तीत अनेक कुटुंब राहत असतानाही अद्याप वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत योग्य ती पावले न उचलल्याने ग्राहकांमध्ये नाराजी असून येणाऱ्या काळात सणासुदीचे दिवस असल्याने त्वरित वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. वीज मंडळाचे विभाजन होऊन वीज वितरण कंपनी अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा आठ दिवस वीजपुरवठा खंडित राहत असेल तर वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आठ दिवसानंतरही जळालेले रोहित्र जैसे थे असून ती काढून घेऊन जाण्याची कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. शिवाय परिसरातील ताराही लोंबकळत असून त्यामध्ये वारंवार घर्षण होऊन वीजपुरवठा सुरळीत राहण्यास अडचण निर्माण होत आहे. शिवाय परिसरातील खांबांवर विविध वेलींनी विळखा मारल्याने व तारांवर पसरत असल्याने अर्थिंग फॉल्ट होऊ शकतो. त्यादृष्टीने या वाढलेल्या वेलीही वीज कर्मचाऱ्यांनी दूर कराव्यात व त्वरित नवीन रोहित्र व जळालेले साहित्य देऊन वीजपुरवठा पूर्ववत विनाविलंब सुरू करावा, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
इंदिरानगर परिसरात आठ दिवसांपासून अंधार
By admin | Updated: September 26, 2016 00:26 IST