विधानसभा उपाध्यक्ष व माजी आमदार यांच्या नावाचा बेकायदेशीर गैरवापर करून फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या राहुल दिलीपराव आहेर याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने राहुलला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दि. २९ ऑगस्टला पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेने राहुल आहेर (रा. शिंदवड, ता. दिंडोरी, हल्ली रा. नाशिक) याला पकडले होते. त्यांच्याजवळील इनोव्हा कारवर बनावट राजमुद्रित लोगो व लोकप्रतिनिधींचे बनावट लेटरपॅड आढळून आले होते. वणी पोलिसांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास न्यायालयाने दि. ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. तपास यंत्रणेस चौकशी करण्याच्या उद्देशाने सरकारी वकिलांनी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आहेर यास तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. दरम्यान, गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास यंत्रणेने सखोल चौकशी केली असून त्याच्या भूतकाळासंदर्भात माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजूनही काही बाबी उजेडात येण्याच्या शक्यतेमुळे चौकशी प्रक्रियेला तपास यंत्रणेला वेग द्यावा लागणार आहे.
‘त्या’ तोतया आमदाराच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST