नाशिक : शहरातील डेअरी व हॉटेल व्यावसायिकांवर मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकले. पहाटे ७ वाजेपासून सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या छाप्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला असून, या कारवाईत नेमके काय सापडले याची माहिती मिळू शकली नाही. मंगळवारी सकाळी शहरातील दूध व हॉटेल व्यावसायिकांच्या सुमारे ९0 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यासाठी राज्यभरातून आयकर विभागाचे पथक शहरात दाखल झाले आहे. जुने नाशिक परिसरातील व्यावसायिकांच्या घरांवर वा दुकानांवर छापे टाकण्यात आल्यामुळे त्यांचे व्यवसाय दिवसभर बंद होते. आयकर विभागाने छापे टाकण्यापूर्वी पोलीस बंदोबस्तासाठी संपर्क केल्याचे वृत्त आहे.आयकर विभागाने शहरात तब्बल नव्वद ठिकाणी छापे टाकल्याचे वृत्त असून, त्यासाठी सुमारे साठ पोलिसांचा बंदोबस्त पुरविण्यात आल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, आयकर विभागाने टाकलेल्या या छाप्यांमध्ये नक्की काय झाले याची माहिती मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)
व्यावसायिकांवर आयकरचे छापे
By admin | Updated: September 8, 2015 23:59 IST