नाशिक : देशाचे पंतप्रधान व भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेवर लक्ष केंद्रित करून विजयाचे आडाखे बांधणाऱ्या भाजपा उमेदवारांचा मोदी यांची सभा रद्द झाल्यामुळे भ्रमनिरास झाला, तर दुसरीकडे मोदींच्या सभेची धास्ती खाल्लेल्या विरोधकांना उकळ्या फुटू लागल्या आहेत. मोदी पुन्हा नाशिक भेटीवर येतील अशी आशा भाजपा नेतृत्वाला वाटते, तर अवघ्या आठ दिवसांत पुन्हा मोदी येतील यावर विरोधकांना शंका आहे.नाशिक जिल्ह्यात मोदी यांच्या सभेचे आयोजन करून नजीकच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही वातावरण निर्मितीला हातभार लागेल असा अंदाज बांधूनच भाजपाने पंतप्रधानांच्या सभेचे ठिकाण व वेळ निश्चित केली होती. विधानसभा निवडणुकीत सेनेबरोबर युती तुटल्यामुळे भाजपाच्या प्रत्येक उमेदवारालाच मोदी यांची जाहीर सभा हवी आहे. मोदी यांच्यामुळेच विजय होऊ शकतो असे वाटणाऱ्या जिल्ह्यातील उमेदवारांना मोदी यांची सभा होणार असल्याने हर्षवायू झाला होता.
भाजपेयींचा भ्रमनिरास; विरोधकांना उकळ्या
By admin | Updated: October 6, 2014 00:52 IST