पांढुर्ली : गाव व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून हिंदुस्थान गॅस कंपनीचे वाहन येत नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. याबाबत एजन्सीकडे विचारणा केल्यावर ‘गॅस सिलिंडर मिळत नसेल तर हॉटेलात जा’, असा अजब सल्ला ग्राहकांना दिला जात असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. पांढुर्लीसह परिसरातील घोरवड, विंचुरीदळवी, सावतामाळीनगर, बोरखिंड, शिवडे, बेलू व आगासखिंड या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिन्दुस्थान पेट्रोलियम कंपनीचे गॅस सिलिंडर मिळत नाहीत. ज्या ग्राहकांकडे दोन सिलिंडर आहे त्यांचे दोन्हीही सिलिंडर रिकामे झाले आहे. वारंवार मागणी करूनही सिन्नर येथील गॅस एजन्सीकडून प्रतिसाद मिळत नाही. याबाबत विचारणा केल्यावर ग्राहकांना अजब सल्ले दिले जातात मात्र गॅसचे वाहन कधी येईल याबाबतची माहिती देण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. दोन महिन्यांपासून ग्राहकांनी बुकिंग केली आहे. कंपनीने गॅस ग्राहकांसाठी आॅनलाइन बुकिंगची सुविधा दिली आहे. बुकिंग केल्यावर गावात वाहन येऊन आपणाला गॅस सिलिंडर मिळेल या आशेवर ग्राहक रोज गॅस सिलिंडर घेऊन येणाऱ्या वाहनाची वाट पाहत आहेत. मात्र दोन महिन्यांचा कालावधी होऊनही या भागात अद्याप गॅसचा पुरवठा झाला नसल्याने स्वयंपाक घरातील हे उपकरणे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. घरात गॅस सिलिंडर (रिकामा) आहे, मात्र स्वयंपाक रॉकेल स्टोव्ह अथवा चुलीवर करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गृहिणी हैराण झाल्या आहेत. चुलीला जळणासाठी सरपण उपलब्ध होत नाही. त्यासाठी जंगलातील झाडे- झुडपांची कत्तल करावी लागते. दिवसभर सरपण गोळा करण्यासाठी पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. तर स्टोव्ह पेटविण्यासाठी रॉकेलची आवश्यकता असते. ते सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे इंधनच नसल्याने गॅसच्या शेगड्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे गृहिणींची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. या परिसरात त्वरित गॅस न मिळाल्यास पांढुर्ली येथे सिन्नर- घोटी रस्त्यावर रिकामे सिलिंडर घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिसरातील गृहिणी व ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)
सिलिंडर मिळत नसेल तर हॉटेलात जा !
By admin | Updated: June 27, 2014 00:16 IST