पंचवटी : राज्य सरकारने येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांबाबत तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास राज्यभरात शेतकऱ्यांना बरोबर घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी मंत्री तथा शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
टमाटा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने मालाचे बाजारभाव कोसळले आहेत. बाजारभाव न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हजारो क्विंटल टमाटा माल जनावरांसाठी सोडून दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गुरुवारी दुपारी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड येथील शरदचंद्र पवार बाजार समितीत टमाटा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
राज्य शासनाने टमाटा उत्पादक शेतकऱ्यांना टमाटा मालासह अन्य भाजीपाल्याला किमान किलोमागे दहा रुपये अनुदान द्यावे तसे नसेल तर शेतीचे पंचनामे करावे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पीक असेल त्यांना एक लाख रुपये अनुदान दिले पाहिजे. शेतकऱ्यांचा अंत पाहण्यापेक्षा त्यांना मदत कशी करता येईल यासाठी सरकारने पुढे यायला पाहिजे. शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवणाऱ्या बळीराजा आर्थिक संकटात सापडल्याने शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.