कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्यामुळे ग्रामीण भागात सध्या ''ना लग्नपत्रिका, ना मंगल कार्यालय, ना बँडबाजा'' अशा परिस्थितीमध्ये लग्नसमारंभ पार पाडले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लग्नसराईत विवाह मुहूर्ताची मोठी रेलचेल दिसून येत आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच लग्न उरकण्यासाठी व अपेक्षित स्थळे मिळविण्यासाठी वधू व वर पक्षाकडील मंडळींची मोठी धावपळ दिसू लागली आहे. कोरोना संसर्ग अद्याप पूर्णपणे गेला नसल्याने कमी खर्चात व मर्यादित लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य आटोपले जात आहे. पाहुण्यांची उपस्थिती कमी झाल्याने कपडे खरेदी, जेवण व्यवस्था, बांगड्या, मंगल कार्यालय, वाजंत्री आदी व्यवसायांवर संक्रांत आली आहे. सध्या लग्न साध्या पद्धतीने होत आहेत. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनंतर लग्न झाल्याचे लोकांना कळते.
इन्फो...
वधू शोधताना दमछाक
स्त्री-भ्रूणहत्या आणि मुलींच्या जन्मदरात घट झाल्याने वर पक्षाची वधू शोधताना चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे एखादे स्थळ चांगले दिसले की, लवकर लग्न उरकण्याची लगबग सुरू होते. अनेकजण दिवाळीनंतरच लग्नकार्य आटोपण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.