नाशिक : गृहखात्याचे प्रमुख व राज्याचेही प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगूनही कुंभमेळ्यासाठी भाड्याने कॅमेरे लावण्यासाठी आग्रही असलेल्या नाशिकच्या पोलिसांनी आता गणेशोत्सव व तत्सम कारणे पुढे करीत सध्याचे कॅमेरे शहरात कायमस्वरूपी करण्यासाठी चालविलेला खटाटोप म्हणजे कॅमेरे बसविणाऱ्या ठेकेदाराचे चांगभलं करण्याचाच प्रयत्न सुरू केल्याची टीका होऊ लागली आहे.सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पाडता यावा तसेच संभाव्य दहशतवादी घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने शहरातील प्रमुख रस्ते, चौक, रामकुंड व साधुग्राम या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या प्रस्तावाला गृहखात्याने मंजुरी दिली होती व त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची तरतूदही केली. कुंभमेळा सहा महिन्यांवर असताना राज्य सरकारने भाडेतत्त्वावर कॅमेरे बसविण्याऐवजी कायमस्वरूपी बसविण्यात यावे असा आग्रह धरला. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच तत्कालीन पोलीस आयुक्तांना या संदर्भात सूचना करूनही ती अव्हेरण्यात आली व कायमस्वरूपी कॅमेरे खरेदी करून ते बसविण्याइतपत वेळ नसल्याचे तकलादू कारण पुढे करून तेच काम ठेकेदाराकरवी करून घेण्यात आले. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा कुंभमेळ्यात कितपत उपयोग झाला हा संशोधनाचा मुद्दा असला तरी, आहे तेच कॅमेरे आता शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी करण्याचा विचार विद्यमान पोलीस आयुक्तांनी चालविला आहे. म्हणजेच भाड्याने पाच कोटी रुपये कॅमेऱ्यांसाठी खर्च केलेले असताना आता कायमस्वरूपी कॅमेरे बसविण्यासाठी पुन्हा तितकेच किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खर्ची टाकण्याची पोलिसांची कृती आहे. शासनाकडून कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी मिळत नाही तोपर्यंत आहे त्याच ठेकेदाराला कायम करण्यात येईल व अगोदर कुंभमेळ्याच्या भाड्याचे पैसे अदा केल्यानंतर शासनाकडून येणारा निधीही त्याच्या घशात घालून एकाच कामासाठी दोनदा पैसे खर्ची पाडण्याचा विक्रम केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
भाड्याने घेतलेले कॅमेरे कायम कसे करणार ?
By admin | Updated: September 23, 2015 00:29 IST