सांगली : भाजपने अखेर सांगलीचे विद्यमान आमदार संभाजी पवार व जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांची उमेदवारी कापली. आज, शुक्रवारी सांगलीतून शहराध्यक्ष व प्रसिद्ध सराफ व्यावसायिक सुधीर गाडगीळ, तर जतमधून विलासराव जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या घडामोडीनंतर पवार यांचे पुत्र पृथ्वीराज यांनी आता शिवसेनेकडून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी पवार घराण्याने शिवसेना-जनता दल-भाजप आणि पुन्हा शिवसेना असे वर्तुळ पूर्ण केले आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना उमेदवारी देण्यास संभाजी पवार यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी पाटील यांच्या प्रचारात सहभागी न होता हातकणंगलेतील महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांचा प्रचार केला होता. सांगलीत त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारी खा. पाटील आणि निष्ठावंत गटाने केल्या होत्या. आता विधानसभेला त्यांना किंवा त्यांचे पुत्र पृथ्वीराज यांना उमेदवारी दिल्यास भाजप मागे पडेल, अशी भीती व्यक्त करत विरोधकांनी मुंबईत तळ ठोकला होता. खा. पाटील यांनी सुधीर गाडगीळ, शिवाजी डोंगरे, नीता केळकर, हणमंत पवार, धनपाल खोत, अरविंद तांबवेकर यांची नावे पुढे केली होती. नीता केळकर वगळता उर्वरित सर्वांनी खा. पाटील यांना सोबत घेऊन मुंबईत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांची भेट घेतली होती. आपल्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, मात्र संभाजी पवार नकोत, असे त्यांनी निक्षून सांगितले होते. उमेदवारीचा हा तिढा सोडविण्यासाठी भाजपने समिती नेमली होती. या समितीच्या सूचनेनुसार पवार यांच्याऐवजी गाडगीळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.आज, शुक्रवारी सकाळी याबाबतचे वृत्त येऊन धडकताच पवार यांचे कार्यालय असलेल्या मारुती चौकात अस्वस्थता निर्माण झाली. पवार समर्थकांनी कार्यालयावरून पक्षाचे फलक, बॅनर उतरवले. पोस्टर फाडली. उमेदवारी कापल्याचे लक्षात येताच संभाजी पवार यांनी स्वत: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला. यादरम्यान शिवसेनाही त्यांच्या संपर्कात होती. ठाकरे यांनी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज यांच्या नावाला होकार दर्शविला. शनिवारी शिवसेनेतर्फे त्यांचा अर्ज भरण्यात येणार आहे. पवारांच्या प्रवासाचे शिवसेना-जनता दल-भाजप आणि पुन्हा शिवसेना असे वर्तुळ पूर्ण होणार आहे. पवारांची राजकीय कारकीर्द सांगली पालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून सुरू झाली. भाजपने जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांचाही पत्ता कट केला. त्यांच्या जागी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विलासराव जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांचा उघड प्रचार करून मताधिक्य मिळवून दिले होते, तर आ. शेंडगे यांचे तळ्यात-मळ्यात सुरू होते. त्यामुळे खा. पाटील यांनी यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. राष्ट्रवादीच्या दलालाकडून भाजप हायजॅक : पवारसंभाजी पवार यांनी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपमधील सर्वजण जयंत पाटील यांना फितूर झाले आहेत. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील भाजप हायजॅक केला आहे. गेली १२ वर्षे भाजपला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र कष्ट केले, पण त्याचा विचार न करता उमेदवारी कापली. ज्यांना उमेदवारी देण्यात आली, त्यांच्यात पक्षाने काय बघितले? केवळ सांगलीतच नव्हे, तर मुंबईतील भाजप कार्यालयातील वातावरण दूषित झाले आहे. गुन्हेगारांना पक्षात घेऊन पवित्र केले जात आहे. त्यांची हमाली आम्ही करणार नाही. भाजपचे नेते मुख्यमंत्रिपदासाठी हपापले आहेत. अखंड महाराष्ट्राचे स्वप्न साकारायचे असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची धमक उद्धव व राज ठाकरे यांच्यात आहे. त्यामुळेच शिवसेनेत प्रवेश करीत आहे. मीही मूळचा शिवसैनिकच आहे. माझ्यासह शेंडगे यांना उमेदवारी डावलून गोपीनाथ मुंडे गटाचे खच्चीकरण करण्यात आले आहे. आता आम्हाला पंकजा मुंडेंची काळजी वाटते.
घरपट्टीला उशीर; नागरिकांना भुर्दंड
By admin | Updated: September 27, 2014 00:25 IST