नाशिक : संगीत कलेतील योगदानाबद्दल पुरस्कार शिक्षकदिनी मिळण्याचा आनंद मोठा आहे. भविष्यातही सर्व संगीत शिक्षकांनी जास्तीत जास्त संगीतप्रेमींना ज्ञानदान करून विद्यार्थी घडवावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीत शिक्षक नंदकुमार देशपांडे यांनी केले. जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आदर्श संगीत शिक्षक पुरस्कार नंदकुमार देशपांडे यांना प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिक यावेळी जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या वतीने केलेला गौरव अविस्मरणीय असल्याचे सांगून पुरस्कार दिल्याबद्दल देशपांडे यांनी ऋण व्यक्त केले. यावेळी बोलताना डॉ. धर्माधिकारी यांनी संगीत हा जीवनाचा अविभाज्य घटक असून आपल्या जीवनातील ताणतणाव यांचे व्यवस्थापन करण्यासाठी संगीत, गायन, वादन यांचे फार मोठे योगदान असल्याचे सांगितले. संघटनेचे सचिव सुनील ढगे यांनी या वेळी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन पुरस्काराचे स्वरूप स्पष्ट केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी संगीत शिक्षकाना प्रोत्साहन देण्याचे काम संस्था करीत असून संस्था दरवर्षी हा पुरस्कार देणार असल्याचे जाहीर केले. तसेच अन्य वेळी ही संस्था सभासदांना मदत करण्यास तत्पर असल्याचेही गायकवाड यांनी नमूद केले.
जिल्ह्यात बरेच गायक, वादक हे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये संगीत शिक्षक म्हणून नोकरी करत आहेत. या वर्षापासून नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनने संगीताचे उत्कृष्ट ज्ञानदान करणाऱ्या संगीत शिक्षकांसाठी पुरस्कार देण्याची संकल्पना कमलेश शिंदे यांनी मांडली. त्यानुसार निवड समितीमार्फत निवड करून दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बराथे यांनी केले. यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश गायकवाड, विद्यमान अध्यक्ष फारुक पीरजादे, उपाध्यक्ष गोकुळ पाटील, कार्याध्यक्ष कमलेश शिंदे, सचिव सुनील ढगे, सहसचिव मंदार पगारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते .
इन्फो
मदतीचा हात
या पुरस्कार सोहळ्यामधेच नाशिकमधील उत्कृष्ट ढोलकी वादक राजेंद्र उबाळे यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नीला आणि महेश गुरव हे सॅक्सोफोन वादक यांना त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी धनादेशाद्वारे आर्थिक मदत देण्यात आली. अशोका बिल्डकॉनचे संचालक लोंढे यांनी कलाकारांसाठी दिलेले किराणा किटचे वाटपदेखील या वेळी करण्यात आले.
फोटो
०५संगीत