नाशिक : मखमलाबाद रस्त्यावरील उदय कॉलनी परिसरात मार्च २०१४ मध्ये झालेल्या प्रवीण ऊर्फ समीर हांडे खून खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. १२) सहा संशयित आरोपींपैकी दोघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबाद रस्त्यावरील उदय कॉलनीमध्ये ९ मार्च रोजी मध्यरात्री प्रवीण ऊर्फ समीर हांडे, दुर्गेश गवळी, स्वप्नील पवार हे तिघे गप्पा मारत उभे होते. दरम्यान, सराईत गुन्हेगार तुकाराम चोथे ऊर्फ तुक्या, नीलेश नेरूळकर, पवारला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हांडे याने मध्यस्ती करत भांडण सोडविले. दरम्यान, हांडे व पवार दुचाकीवरून जात असताना तुक्या व नेरूलकर यांनी त्यांना रस्त्यात थांबवून भांडणाची कुरापत काढून तुक्याने गावठी पिस्तुलाने गोळी झाडली. या गोळीबारात हांडेचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात १० मार्च रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी आठवडाभरात सर्व संशयितांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. दोन वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालयात हा खून खटला सुरू होता. याप्रकरणी गुरुवारी न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांच्या न्यायालयात या खटल्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपी सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे व नीलेश नेरूळकर यांना आजन्म सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तुक्याने अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सरकारपक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी कामकाज चालविले. (प्रतिनिधी)
हांडे खून प्रकरणी दोघांना जन्मठेप
By admin | Updated: January 13, 2017 01:41 IST