पंचवटी : नाशिक जिल्ह्यात पुरेसे पाणी नसताना मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशाची राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करून निषेध नोंदविला.मराठवाड्यात पाणीटंचाई असल्याचा दावा करून तेथील धरणे भरण्यासाठी नाशिकमधील गंगापूर आणि दारणा या धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले असून, ३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेतही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे हा अहवाल मागे यावा व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी केली तसेच यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाप्रसंगी कार्याध्यक्ष वैभव देवरे, सनी ओबेरॉय, अमोल आव्हाड, मुकेश शेवाळे, संतोष जगताप, अमोल नाईक, बंडू दातीर, राहुल तुपे आदिंसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, शासनाने या प्रकरणी तत्काळ दखल घेऊन कारवाई न केल्यास आगामी कालावधीत उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे अंबादास खैरे यांनी सांगितले. (वार्ताहर)
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसकडून ’त्या’ आदेशाची होळी
By admin | Updated: October 24, 2015 23:40 IST