सातपूर : बेळगाव ढगा शिवारात श्रमिकनगर येथील एका इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि़ १२) दुपारच्या सुमारास उघडकीस आला़ नामदेव भिका सोनवणे (५२) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून सातपूर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव ढगा शिवारातील पांझरपोळजवळील खडकाळी नाल्याशेजारी श्रमिकनगरमधील नामदेव सोनवणे यांचा सोमवारी (दि़ ११) मध्यरात्री ते मंगळवारी (१२) दुपारच्या दरम्यान डोक्यात दगड घालून खून करण्यात आला़ मयत सोनवणे हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका लहान उद्योगात नोकरीला होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे़ सोनवणे घरी न आल्याने त्यांचे कुटुुंबीय सातपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी पोहोचले असता बेळगाव ढगा परिसरात एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलीस व त्यांचे कुटुंबीय हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर तो मृतदेह सोनवणेंचा असल्याचे समोर आले़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे व गुन्हे शाखेचे निरीक्षक अमृत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (वार्ताहर)
इसमाचा दगडाने ठेचून खून
By admin | Updated: April 13, 2016 00:34 IST