नाशिक : सातपूर विभागातील एमआयडीसी कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवज असलेल्या फाईल गहाळ प्रकरणातील आरोपी उद्योजक इंदरपालसिंग साहनी यांनी एक कोटी ४५ लाख रुपये भरल्यानंतरच जामीन दिला दिला जाईल; तोपर्यंत साहनी यांना मध्यवर्ती कारागृहातच राहावे लागेल, असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि़ ७) जामीन अर्जावरील निकालात म्हटले आहे़ उद्योजक साहनी यांना रक्कम भरण्यास सांगून उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे़औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवज असलेल्या फाईल गहाळ प्रकरणी सातपूर पोलिसांनी सप्टेंबरमध्ये उद्योजक साहनींविरोधात गुन्हा दाखल केला़ या प्रकरणात अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत काही महत्त्वाची कागदपत्रेही साहनी यांच्याकडून जप्त करण्यात आली़ न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर साहनी यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात केल्यानंतर जामिनासाठी अर्ज केला होता़ मात्र जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता़ या अर्जावर न्यायमूर्ती गडकरी यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली़ उद्योजक साहनी यांनी एमआयडीसीचे एक कोटी ४५ लाख रुपये भरल्यानंतरच जामीन देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले़ त्यामुळे जोपर्यंत साहनी रक्कम भरत नाहीत तोपर्यंत त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार हे स्पष्ट झाले आहे़
उद्योजक साहनी यांना उच्च न्यायालयाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:54 IST