वावी : ग्रामस्थांनी आपसात भांडणे न करता एकोपा राखून गावाचा व स्वत:चा विकास साधावा, असे आवाहन निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे यांनी केले. वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ंमहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी होऊन उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या गावांतील प्रतिनिधींना आटोळे यांच्याहस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यावेळी आयोजित पोलीस पाटील बैठक व बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. आपसातील भांडणांमुळे नागरिकांना वेळ व पैसा वाया जातो. गुन्हे दाखल झाल्यानंतर न्यायालयात चकरा माराव्या लागतात. त्यात मानसिक त्रास होतो. हे सर्व टाळण्यासाठी आपल्या गावात भांडणे होणार नाही आणि झालेच ते आपसात तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून मिटविल्यास सर्वांचा फायदा होईल असे आटोळे यांनी सांगितले. यावेळी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पाथरे बुद्रुक गावाला तीन लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले. आटोळे व पाटील यांच्याहस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पाथरे बुद्रुक गावचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब नरोडे व सरपंच सौ. मंदा चिने यांनी पुरस्काराचा धनादेश स्विकारला. धनगरवाडी (पिंपळगाव), मऱ्हळ खुर्द व माळवाडी (फुुलेनगर) या तीन गावांना प्रत्येक एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. धनगरवाडी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवाजी घुले, सरपंच गोवर्धन शिंदे, ग्रामसेवक आशा गोडसे, मऱ्हळ खुर्द तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अशोक कुटे, सरपंच आशा चंद्रकांत कुटे, ग्रामसेवक यु. पी. वर्पे तर माळवाडी (फुलेनगर) तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष खंडेराव अत्रे, सरपंच ज्ञानेश्वर लोंढे व ग्रामसेवक प्रतिभा गांडोळे यांनी सदर पुरस्काराचे धनादेश स्विकारले.शासनाकडून पाथरे बुद्रुकला मिळालेला तीन लाख, धनगरवाडी, मऱ्हळ खुर्द व फुलेनगर या गावांना मिळालेल्या प्रत्येक एक लाख रुपयांचा बक्षीस निधी प्रत्येक गावाने स्वच्छता, रस्ते व पाणीपुरवठ्या संबंधीच्या विकास कामांसाठी वापरावा असे आवाहन आटोळे यांनी केले. (वार्ताहर)
एकोपा राखून गावांनी आपला विकास साधावा
By admin | Updated: November 21, 2014 23:05 IST