लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कमी वेळेत धुवाधार कोसळून जलमय करून टाकणाऱ्या पावसाचे यंदाचे प्रमाण पाहता नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तत्काळ बचाव व मदत कार्य उभे करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक तसेच लष्काराची मदत घेण्यासाठी धोकेदायक ठिकाणांची निश्चिती करण्यात आली असून, त्यासाठी शनिवारी समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व लष्कराच्या प्रतिनिधींसमोर जिल्ह्याचा आपत्ती निवारण आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यात पडणारा पाऊस, धरणांची क्षमता, पाणी सोडल्यास पूर येणाऱ्या नद्या, नदी काठची गावे व आजवर आलेल्या महापुराचा इतिहास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जून महिन्यात पावसाने कमी वेळेत जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत, ते पाहता मदत कार्याचे नियोजन करताना कमीत कमी वेळेत पथके घटनास्थळी कसे पोहोचतील याची काळजी घेण्याचे तसेच त्यांना रस्ता मार्गाची माहितीही देण्यात आली आहे. या पथकांना ऐनवेळी स्थानिक पातळीवरून काय सहाय्य उपलब्ध करून देता येईल त्याची माहितीही गोळा करण्याचे ठरविण्यात आले या बैठकीस जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, लष्कराचे मेजर शंतनू धार, राजेश शेंणवाल, एनडीआरएफचे सचिन नलवाडे, आर्किता जोना, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांच्यासह पाटबंधारे व बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हा आपत्ती निवारण आराखड्यानुसार गेल्या काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व लष्कराने धोकेदायक ठिकाणांची रेकी केली होती, त्यानुसार पुराची परिस्थिती उद्भवल्यास बचाव व मदत कार्यातून बाहेर काढलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यासाठी शाळा, समाजमंदिरे, मंगल कार्यालये, खासगी जागांचा उपयोग करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची घेणार मदत
By admin | Updated: July 2, 2017 01:01 IST