सिन्नर : येथील लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयाच्या वतीने देवळाली येथील आर्टिलरी सेंटर येथील जवानांना राख्या बांधून राष्ट्र संरक्षक रक्षाबंधन उत्साहात पार पडले. स्व. आमदार डॉ. वसंतराव पवार स्मृती समिती व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून विद्यालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे एक हजार विद्यार्थिनींनी सिन्नर तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत सीमेवर भारत मातेचे रक्षण करणाऱ्या जवानांना राख्या बांधल्या व देशाच्या संरक्षणासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. या उपक्रमात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सिन्नर महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, पांढुर्ली, नायगाव, कोमलवाडी, वडांगळी, मीठसागरे, सायाळे, गोंदे, मनेगाव आदिंसह १४ शाळा सहभागी झाल्या होत्या. तसेच रयत शिक्षण संस्थेचे पुंजाजी रामजी भोर विद्यालय, सिन्नर येथील वंदे मातरम् संघटनेने सहभाग घेतला. रक्षाबंधन कार्यक्रमात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, संचालक कृष्णाजी भगत, लायन्स क्लबचे सिन्नरचे अध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते मेजर गौरव साहब, सुभेदार मेजर दयाल सिंह, गुरुपांडू सुब्रह्यन्यम् , अबिद हुसेन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वीर जवानांना राख्या बांधताना त्यांना ‘राष्ट्रही सर्वस्व तेरा, राष्ट्रही हे प्राण तेरा, राष्ट्र की आशा आपपर, राष्ट्रही निर्भर तुझपर’ अशा ओळी छापलेले शुभेच्छ पत्र देण्यात आले. सिन्नर तालुक्यातील १४ शाळांनी सात हजार शुभेच्छापत्रावर राख्या बांधून त्या देशाच्या वीर जवानांसाठी पाठविण्यासाठी मेजर गौरव साहब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्या वीर जवानांकडे पोहोचविण्याची विनंती श्रीमती पवार व भगत यांनी केली. यावेळी सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. काळे, वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. खैरनार, उपमुख्याध्यापक आर. पी. म्हस्के, सीमा जाधव, सुनील खालकर, एस. पी. पांगारकर, एस. टी. पांगारकर, के. आर. फटांगळे, दीपक वैष्णव, श्रीमती एम. ए. बनकर, श्रीमती ए. पी. शिंदे, एच. पी. वाघ, प्रा. जावेद शेख, सुमंत गुजराथी आदि उपस्थित होते. क्रीडाशिक्षक मनोहर कासार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. (वार्ताहर)