मागील आठवडाभरापासून शहराचे वातावरण निरभ्र झाले होते; मात्र पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण किनारपट्टीसह राज्यात ढग दाटून येत आहे. शहरात मंगळवारी अचानकपणे पहाटेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. इंदिरानगर, डीजीपीनगर, वडाळागाव, उपनगर, जुने नाशिक, पंचवटी आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले असून रब्बीची पिके धोक्यात सापडली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये नाशिकचा पारा दहा अंशांपर्यंत घसरल्यानंतर अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले होते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातसुध्दा वातावरणाची स्थिती बिकट होती. मळभ दाटून आले होते. काही दिवसांपूर्वी थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली होती आणि आकाशही निरभ्र झाल्याचा अनुभव नाशिककरांना येत होता; मात्र पुन्हा एकदा लहरी निसर्गामुळे शहरातील वातावरण बिघडले आहे. मंगळवारी शहरात २८.२ इतक्या कमाल तर १७.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. सकाळी शहरात सुमारे ८७ टक्के आर्द्रतेचे प्रमाण नोंदविले गेले.