संदीप भालेराव / नाशिकसीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ठरवून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डावलली असून अधिकाऱ्यांच्या दालनातच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांवरील अविश्वासामुळेच हे कॅमेरे लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवरून बोलण्यावरही आक्षेप घेण्यात आला होता. आरोग्य विद्यापीठातील अधिकारी कुलगुरू व कुलसचिवांच्या रडारवर राहिले आहेत. अधिकाऱ्यांनी कुणाशी बोलायचे, कुणाला केबिनमध्ये घ्यायचे, कुणाशी संपर्क ठेवायचा, कोणतीही चर्चा करायची नाही, अशा अनेक तोंडी सूचना नेहमीच केल्या जातात. इतकेच नव्हे तर मध्यंतरी अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी टॅप केले जात असल्याची चर्चा होती. अधिकाऱ्यांकडे संशयाने पाहिले जात असल्यामुळे ते दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत. आता तर त्यांच्या दालनातच कॅमेरेच बसविल्याने त्यांचे ‘स्वातंत्र्य’ धोक्यात आले आहे. शासनाचे नियम आणि कायद्याच्या चौकटीतच प्रत्येक काम केले जाईल, असे कुलगुरू वारंवार सांगत असताना कॅमेरे मात्र नियमबाह्य लावण्यात आल्याचे दिसते.अविश्वास कशासाठी? : एखाद्या अधिकाऱ्याच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरा लावता येऊ शकतो, परंतु त्यास त्याची संमती असली पाहिजे. किंबहुना काही खासगी कार्यालयात संबंधित त्यांच्या केबिनमध्ये कॅमेरे लावतात. त्यामागे त्यांची व्यक्तिगत सुरक्षितता हे एक प्रमुख कारण असते. आरोग्य विद्यापीठात ज्या केबिनमध्ये कॅमेरे बसविले आहेत तेथे कुठेही परीक्षा अथवा आर्थिक विषयाशी संबंधित कामे होत नाहीत, मात्र अविश्वासातूनच कॅमेरे लावल्याची चर्चा विद्यापीठात आहे.
‘आरोग्य’चे अधिकारी ‘नजरकैदेत’
By admin | Updated: January 10, 2017 04:19 IST