पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विरेकर (गारोबा काकानगर) बुधवार (दि. १०) यांच्या घरातील सर्व जण सकाळी नऊ वाजता कामासाठी निघून गेले असता, विरेकर व सून पूजा घरी होत्या. त्या वेळी दोन अनोळखी इसम येऊन आम्ही सोन्या-चांदीच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो. तुम्हाला करायची आहे का, असे विचारले असता, त्यांच्यावर विश्वास ठेवून दोघींनी पायातील चांदीच्या पट्ट्या पॉलिश करण्यासाठी दिल्या. यावर त्या दोघा इसमांनी त्यांच्याजवळ असलेल्या पावडरने चांदीच्या पट्ट्या पॉलिश करून दिल्या. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास बसला, म्हणून दोघींनी अंगावरील सोन्याचे पोत व कानातले काढून दोघा इसमांना पॉलिश करण्यासाठी दिले.
त्या इसमाने कुकर आणण्यासाठी सांगितला, म्हणून सुनीता यांनी घरातून कुकर आणून दिला. कुकरमध्ये पाणी टाकून लाल रंगाची पावडर आणि हळद टाकली. त्यामध्ये सोन्याची पोत, कानातले असे सोन्याचे दागिने टाकले. त्यानंतर गॅस पेटवून त्यावर पाच मिनिटे कुकर ठेवण्यास सांगितले. सुनीता या कुकरजवळ उभ्या असताना ते दोघे इसम घराबाहेर निघून गेले. पाच मिनिटांनी कुकर उघडून पाहिला असता, दोघांचे दागिने कुकरमध्ये आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की, फसवणूक झाली आहे, म्हणून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--इन्फो--
चोरीला गेलेले सोन्याचे दागिने असे...
सोन्याची पोत ७५ हजार रुपये, कानातील ३७ हजारांची सोन्याची वेल असे एकूण १ लाख १२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लांबविले.