नाशिक : एलबीटीची थकबाकी आणि मुदतीत विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नववर्षाच्या पहिल्या दिवशी कारवाईने स्वागत न करण्याचे औचित्य महापालिकेने गुरुवारी पाळले; परंतु शुक्रवारपासून (दि.२) थकबाकीदार व्यापाऱ्यांविरुद्धची कारवाई पुन्हा एकदा सुरू होणार असून सुमारे ४७०० व्यापाऱ्यांना बॅँक खाती गोठविण्यासंबंधीच्या नोटिसा बजावण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने डिसेंबर अखेर एलबीटीच्या माध्यमातून ४९८ कोटी रुपयांपर्यंत झेप घेतली असून, डिसेंबर महिन्यात सुमारे ६२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.महापालिकेने एलबीटीची थकबाकी आणि मुदतीत विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावत सुमारे ४०० व्यापाऱ्यांची बॅँक खाती गोठविण्याची कारवाई केली होती. विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंडही वसूल केला जात होता. पालिकेच्या या कारवाईविरुद्ध व्यापारी महासंघाने आवाज उठवत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि कारवाई स्थगितीचे आश्वासन मिळविले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून सूचना देऊनही पालिका कारवाई थांबवत नसल्याबद्दल व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर पालिका आयुक्तांनी ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई स्थगित ठेवण्याची सूचना एलबीटी विभागाला दिली होती. बुधवारी स्थगितीची मुदत संपल्यानंतर गुरुवारी नववर्षाच्या प्रारंभी महापालिका व्यापाऱ्यांना दणका देणार काय, अशी चर्चा सुरू असतानाच पालिकेने मात्र व्यापाऱ्यांचे नववर्षाच्या पहिल्या दिवशी कारवाई न करण्याचा उदारपणा दाखविला. मात्र, शुक्रवारपासून कारवाई पहिल्यापेक्षा आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले. त्यानुसार सुमारे ४७०० व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यासंबंधीची तयारी केली जात होती. दरम्यान, विवरणपत्र भरण्याबाबतची मुदत संपलेली नसून व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक असल्याचे एलबीटी विभागाचे उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांना पालिकेच्या शुभेच्छा
By admin | Updated: January 2, 2015 00:49 IST