नाशिक : ‘जादा काम जादा दाम आणि कामचुकारांना दंड’, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सफाई कामगारांची मोबाइल अॅपद्वारे हजेरी नोंदविण्याची पद्धत अंमलात आणण्याचा निर्णय घेतला असून, प्रायोगिक तत्त्वावर त्याची सुरुवात करण्यात येणार आहे. याशिवाय, सफाई कामगारांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी मंगळवारपासून विभागनिहाय मनपाचे अधिकारी हजेरीशेडवर हजेरी लावणार आहेत. दरम्यान, सफाई कामगारांच्या संघटनेने सदर हजेरी पद्धतीस विरोध दर्शवित आधी सफाई कामगारांना नियमानुसार सेवा-सुविधा पुरवा मगच बायोमेट्रिकचा अवलंब करा, असा पवित्रा घेतला आहे.महापालिकेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धत लागू करण्यात आलेली आहे. हीच पद्धत महापालिकेच्या १९९३ कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी महापालिकेने कामगारांच्या अंगठ्यांचे ठसेही घेण्याचे काम पूर्ण केले होते; परंतु सफाई कामगारांच्या संघटनांनी त्यास विरोध दर्शविला होता. शिवाय, प्रत्येक हजेरीशेडवर बायोमेट्रिक हजेरी नोंदणीचे मशीन बसविणे अवघड असल्याने त्याची अंमलबजावणी लांबली होती. परंतु, सफाई कामगारांच्या हजेरीविषयी तक्रारी पाहता महापालिका आयुक्तांनी सिंहस्थात साधुग्राम, तपोवनात मोबाइल अॅपद्वारे राबविलेल्या सेल्फी हजेरी पद्धतीच्या धर्तीवर सफाई कामगारांनाही मोबाइल अॅपद्वारे हजेरी घेण्याची यंत्रणा लागू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, काही कामगार कामचुकार असतात; परंतु बरेचसे कर्मचारी हे जास्त वेळ काम करतात. त्यांना त्या जादा कामाचा मेहनतानाही मिळाला पाहिजे. त्यासाठी मोबाइल अॅपद्वारे हजेरीची पद्धत उपयुक्त ठरणार आहे. जे कामात टाळाटाळ करतात त्यांचाच या पद्धतीला विरोध आहे. परंतु प्रायोगिक तत्त्वावर सदर पद्धत अंमलात आणली जाणार असून, त्यात कितपत यश येते, यावर पुढचा निर्णय घेतला जाईल. सफाई कामगारांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, असा महापालिकेचा आग्रह असून त्यासाठीच मंगळवारपासून (दि.९) अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त हे स्वत: हजेरीशेडवर जाऊन सफाई कामगारांच्या समस्या समजून घेऊन त्यावर कार्यवाही करतील. हजेरीशेडवर पाणी व स्वच्छतागृहही पुरविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सफाई कामगारांची मोबाइल अॅपद्वारे हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:26 IST