नाशिक : सूर्योदयाबरोबरच ‘बोला बजरंग बली की जय’, ‘पवनपुत्र हनुमान की जय’, अशा नामघोषाने रामप्रहरी नाशिकनगरी दुमदुमली. शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ शहराच्या सराफ बाजारातील सोन्यामारुती मंदिर, गंगेवरील दुतोंड्या मारुती, आडगाव येथील काट्या मारुती, पंचमुखी मारुती, तपोवनातील बटूक हनुमान, उंटवाडीरोडवरील दक्षिणमुखी मारुती अशा प्रमुख मंदिरांसह उपनगरे, विविध चौक व गल्ल्यांमधील मारुती मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला़ मंदिरांत पहाटेपासून भजने, प्रवचने, गीतरामायण, हनुमानचालिसा, हनुमान स्तोत्र, अभिषेक, पूजन, महाप्रसाद यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ सूर्योदयाबरोबर ‘बोला बजरंग बली की जय’, ‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘महाबली हनुमान की जय’ असा जयघोष करीत हनुमान मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली़ महिला वर्गाने मारुती जन्माचे पाळणे सादर केले़ यावेळी सुंठवडा वाटण्यात आला़ हनुमानाला रुईच्या पाना-फुलांच्या माळा, शेंदूर, तेल व नारळ अर्पण करून दर्शन घेण्यासाठी सर्वच मंदिरांत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या़
हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
By admin | Updated: April 5, 2015 01:16 IST