पंचवटी : आडगाव शिवारातील साई सदन, साई मैत्री रो-हाउस, गजानन पार्कपरिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सकाळी हंडा मोर्चा काढून नगरसेवक मीना माळोदे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी अत्यंत कमी दाबाने येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय परिसरात रस्ते तसेच पथदीपांची समस्या असल्याने नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सकाळी माळोदे यांच्या कार्यालयावर हंडामोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. माळोदे कार्यालयात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने अखेर माळोदे यांनी संपर्क कार्यालय गाठले त्यानंतर माळोदे यांनी नागरिकांशी चर्चा केल्यानंतर महिलांनी नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी निवेदन दिले. या आंदोलनात किरण गटकळ, मंगेश जाधव, रावजी पाटील, प्रवीण खांडगे, एकनाथ पालवे, शरद इंगळे, जनार्दन कोल्हे, सुरेश पवार, विजय धात्रक, भगवान साळवे, मधुकर तडाखे, मधुकर मराठे, पंढरीनाथ कदमबांडे, अरुण लोणे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
नगरसेवकाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा
By admin | Updated: September 26, 2016 01:19 IST