लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या दैनंदिन पाणीपुरवठा योजनेबाबत अनेकदा तक्रारी कानी येत असतात. नळाद्वारे विविध भागांमध्ये गढूळ मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा झाल्याचा प्रकार यापूर्वी समोर आला आहे; मात्र वडाळागावातील तैबानगर परिसरात पंधरवड्यापासून चक्क गटारीच्या सांडपाण्यासारखे पाणी नळांमधून येत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.महिनाभरापासून वडाळागावातील माळी गल्ली, रझा चौक, मनपा शाळेजवळचा परिसर, कोळीवाडा, रामोशीवाडा आदि भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महेबूबनगर, साठेनगर या भागांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तैबानगर, हाजी नवाब सोसायटी या भागांमध्ये सुमारे ५० पेक्षा अधिक कुटुंबांच्या नळांना गटारीच्या सांडपाण्यासारखे काळेकुट्ट पाणी येत असल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली आहे. पंधरा दिवसांपेक्षा अधिक दिवस उलटूनदेखील या भागात अद्याप शुद्ध व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने पाणी वापरण्यासारखे नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना तुरटी अथव जलशुद्धीकरण द्रव्य टाकून पाणी वापरावे लागत आहे. तरीदेखील दूषित पाण्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार या भागातील रहिवाशांनी केली आहे. जुनाट जलवाहिन्यांमुळे वडाळागावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महिनाभरापासून वडाळागावातील गोपालवाडी रस्ता, जय मल्हार कॉलनी, रझा चौक, तैबानगर, फुलेनगर, कोळीवाडा, माळी गल्ली या भागात खड्डे खोदून जलवाहिन्यांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खड्डेच-खड्डे नजरेस पडत आहेत.
वडाळागावात नळांना चक्क गटारीचे पाणी
By admin | Updated: May 9, 2017 02:24 IST