महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद दि. ४ ते ६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत नवी मुंबईजवळील ऐरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना दि. १ ते ६ फेबु्रवारी या सहा दिवसांच्या कालावधीसाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केलेली आहे. नाशिकपासून अवघ्या सव्वाशे कि.मी. अंतरावर असलेल्या ऐरोलीला जाण्यासाठी सुमारे तीन तासांचा अवधी लागतो. परंतु, महापालिका शाळांमधील तब्बल ५४४ शिक्षकांनी दि. १ फेबु्रवारीपासूनच अधिवेशनाच्या निमित्ताने मिळणाऱ्या विशेष रजेचा लाभ उठविल्याने मनपाच्या अनेक शाळा ओस पडल्या आहेत. दोन रविवार लागून तब्बल आठ दिवसांची सुटी उपभोगण्यास मिळणार असल्याने संघटनेचे सदस्यत्व घेतलेल्या अनेक शिक्षकांचे अधिवेशनाच्या नावाखाली पर्यटनही सुरू असल्याची चर्चा आहे. शहरात नाशिक महापालिका शिक्षण समितीच्या १२७ शाळा असून, ९६९ शिक्षक आहेत. शिक्षक संघटनेने तब्बल ५४४ शिक्षकांची यादीच प्रशासनाधिकाऱ्यांना सादर केल्याने उर्वरित सुमारे ४२५ शिक्षकांवर लाखभर विद्यार्थ्यांना सांभाळण्याची वेळ आली आहे. गेल्या सोमवार (दि.१) पासूनच शाळांमधून शिक्षक विशेष रजेवर गेल्याने काही शाळांमध्ये एक-दोन शिक्षकांवरच भार येऊन पडला आहे, तर काही शाळांमधील सर्वच्या सर्व शिक्षकांनी ऐरोलीकडे प्रस्थान केल्याने अशा शाळांना चक्क कुलूप ठोकावे लागण्याची नामुष्की मनपा शिक्षण समितीवर आली आहे. सुमारे ४० ते ४२ शाळांमधील सर्वच्या सर्व शिक्षक अधिवेशनाला गेल्याने त्या बंद ठेवाव्या लागल्याची हतबलता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
गुरुजी ऐरोलीत, पोरं गल्लीत!
By admin | Updated: February 3, 2016 22:47 IST