नाशिक : भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर मंत्री शहरात दाखल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ सीटू संघटनेने शनिवारी (दि़२) शासकीय विश्रामगृहावर मोर्चा काढून तीव्र घोषणाबाजी केली़ या मोर्चेकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे वाहन अडविल्याने पोलिसांची धावपळ उडाली होती़ भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह सुमारे डझनभर मंत्री शनिवारी शहरात दाखल होत होते़ गोल्फ क्लब मैदानाजवळील शासकीय विश्रामगृहावर आगमन केल्यानंतर विश्रांती तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यानंतर मंत्रीगण कार्यक्रमस्थळी रवाना होत होते़ शहरात येणाऱ्या या मंत्रिमंडळाचे औचित्य साधत कामगारांच्या विविध प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पार्टीप्रणीत सीटू कामगार संघटनेच्या सुमारे ६० सदस्यांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास थेट विश्रामगृहावरच मोर्चा काढला़ पालकमंत्री गिरीश महाजन हे पक्षाच्या बैठकीसाठी निघाले असताना तर मुख्यमंत्री काही वेळातच विश्रामगृहावर पोहोचणार असतानाच मोर्चेकऱ्यांनी विश्रामगृहावर धडक दिली़ यामुळे अडकून पडलेल्या पालकमंत्र्यांना जाऊ देण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी शिष्टाई केली़ मात्र जोपर्यंत आमच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले जात नाही तोपर्यंत कोणालाही जाऊ देणार नसल्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली़ अखेरीस पालकमंत्री महाजन प्रवेशद्वारावर आले व निवेदन स्वीकारले़ मात्र, कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली असता पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत रात्री भेट घडवून देण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेली़पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात शासनाकडून किमान वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जात नाही, कामगार आयुक्तांच्या आदेशास उद्योजकांकडून दाखविली जाणारी केराची टोपली, संदर्भ सेवा रुग्णालयातील कामगारांचा पुढाऱ्यांकडे ठेका असून ४० हून अधिक कामगारांना किमान वेतन दिले जात नाही, अशा समस्या मांडल्या़ तसेच कामगार मंत्र्यांनी जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या जाणून घेऊन मार्गी लावण्याची मागणी सीटूचे राज्य सरचिटणीस डॉ़ डी़ एल़ कराड, जिल्हाध्यक्ष श्रीधर देशपांडे, जिल्हा सरचिटणीस सीताराम ठोंबरे यांनी केली़सीटूच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त एऩ अंबिका, श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ, पोलीस निरीक्षक डॉ़ सीताराम कोल्हे, बाजीराव महाजन व पोलीस कर्मचाऱ्यांनी विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावरील मोर्चकऱ्यांना रोखले़ (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांना रोखले
By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST