चवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने उद्या बुधवारी सकाळी तपोवन साधुग्राममध्ये ध्वजारोहण करण्यात येणार असून, या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी मध्यरात्री अचानकपणे साधुग्रामला भेट देत व्यवस्थेची पाहणी केली. ‘पालकमंत्री अॅट साधुग्राम इन नाईट’ असे म्हणत अनेक अधिकाऱ्यांची धावपळ झाली. बुधवारी साधुग्राममधील दिगंबर, निर्वाणी व निर्माेही या प्रमुख आखाड्यांचे ध्वजारोहण होणार असून, या ध्वजारोहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तसेच अन्य नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. ध्वजारोहणानिमित्ताने प्रशासनाने काय तयारी केली आहे याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली. यावेळी पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, भाजपा शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
पालकमंत्र्यांनी मध्यरात्री केली साधुग्रामची पाहणी
By admin | Updated: August 18, 2015 23:56 IST