नाशिक : कुंभमेळा पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी एकत्र येत ‘हरित कुंभ’ संकल्पनेचा सुरुवातीला जागर केला. मात्र पहिल्या पर्वणीलाही हरित कुंभबाबत जागर करण्याचा विसर सरकारी यंत्रणेला पडला होता. याचाच कित्ता पुन्हा गिरवित दुसऱ्या महापर्वणीलाही जनजागृतीकडे दुर्लक्ष करणे प्रशासनाने पसंत केले अन् पर्यावरण व नदीच्या संवर्धनावर पाणी फेरले. सकाळपासून भाविकांचा जनसागर गोदाकाठी शाहीस्नानाच्या पर्वणीसाठी लोटला होता. पर्वणीच्या निमित्ताने सुमारे तीन महिन्यांपासून प्रशासनाकडून विविध सामाजिक व पर्यावरणप्रेमी संघटनांच्या मदतीने शहरात ‘हरित कुंभ’ संकल्पनेचा जागर करण्यात आला. या अंतर्गत शासकीय यंत्रणेकडून विविध पर्यावरणपूरक उपक्रमही राबविले गेले. पर्वणीच्या काही दिवस अगोदरच हरित कुंभ संकल्पनेचा एका राष्ट्रीय चर्चासत्रात ऊहापोह करण्यात आला. मात्र ऐन पर्वणीच्या दिवशीच प्रशासनाने हरित कुंभ, गोदा प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास या सर्वांवर पाणी सोडल्याने नाशिककरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
हरित कुंभाचा जागर पुन्हा दुर्लक्षित
By admin | Updated: September 15, 2015 22:35 IST