नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व मजुरांना रोजगार पुरविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळ्यांची कामे ग्रामपंचायत/ कृषी विभागामार्फत घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.१४ सप्टेंबरच्या नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार आता ग्रामपंचायत, कृषी विभाग व इतर यंत्रणा यांच्यामार्फत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णयात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीमार्फत छोट्या आकारमानाचे शेततळे (१० बाय १० बाय ३ मीटर, १५ बाय १० बाय ३ मीटर, १५ बाय १५ बाय ३ मीटर) घेण्यात यावीत, शासन निर्णय २८ फेब्रुवारी २०१४ अन्वये निर्धारित केलेली सर्व आकारमानाची शेततळे कृषी विभागामार्फत घेण्यात यावीत, इतर यंत्रणेकडे जर तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असेल, तर त्यांच्यामार्फत २८ फेब्रुवारीच्याच शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. याच शासन निर्णयानुसार निर्धारित केलेली आकारमाने, आर्थिक निकष व विहीत कार्यपद्धती यांचे पालन करावे.या निर्णयानुसार संबंधित ग्रामपंचायती व कृषी विभागालाही आता शेततळे उभारण्याची कामे करता येणार आहेत. (प्रतिनिधी)
शेततळ्यांची कामे करण्यास हिरवा कंदील
By admin | Updated: September 15, 2015 22:58 IST