खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडला असून, दिवसेंदिवस द्राक्षशेतामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या वाढत आहेत. पुढील बाजारभावाचा कोणताही अदांज नसताना खर्च मात्र वाढत आहे. त्यात सध्या बाजारामध्ये रद्दीचा भाव चाळीस रुपये प्रतिकिलो झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत रद्दीच्या भावात दुपटीने वाढ झाल्यामुळे उत्पादक हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे मागील द्राक्ष हंगाम संपूर्णपणे तोट्यात गेला. काही शेतकऱ्यांनी द्राक्ष पाच ते दहा रुपये किलो या मातीमोल भावात विकली तर काही शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर खुडून टाकली होती तर अनेक शेतकऱ्यांना व्यापारी वर्गाने कवडीमोल भावात पैसे दिले आहे. शेतकरी नव्या उमेदीने उभा राहून चालू हंगाम पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात मुजरांना पैसे हे रोख स्वरूपात द्यावे लागतात. सध्या द्राक्षकामाची मजुरी वाढली आहे. द्राक्ष घडांच्या थिनिंगसाठी एकरी १४ ते १५ हजार रुपये मजुरी द्यावी लागत असून, डिपिंगसाठी चार ते साडेचार हजार रुपये तर छाटणीचा खर्च पाच हजार रुपये त्याप्रमाणे अतिरिक्त मणी काढण्यासाठी सात ते आठ हजार एकरी मजुरी द्यावी लागते. उत्पादकाला एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी ३० ते ३५ रुपये खर्च सध्या येत आहे.
-------------------
सध्या बाजारामध्ये रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे ५० किलोच्या गोणीला १३०० ते १४०० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात. कीटकनाशक बुरसीनाशकाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. डिपिंगचे एक औषध तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिलिटर आहे तर खताची २५ किलोच्या गोणीची किंमत दोन हजारांपासून तीन हजारांपर्यंत वाढलेली आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना द्राक्षशेताचा ताळमेळ बसत नाही. द्राक्षाचे घड झाकण्यासाठी लागणाऱ्या रद्दीच्या भावात मागील वर्षीपेक्षा दुपटीने भाव झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
---------------
बाजारामध्ये रद्दीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, निर्यातक्षम द्राक्षबागांना घडांच्या सुरक्षिततेसाठी तसेच गुणवत्ता व थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पेपर लावणे आवश्यक आहे. त्यामुळे चालू वर्षी रद्दीचा खर्च वाढणार आहे.
- सुनील शिंदे, द्राक्ष अभ्यासक